उन्हाळी भुईमुगाची पेरणी पूर्ण   

इंदापूर, (प्रतिनिधी) : भुईमूगाची उन्हाळी हंगामातील पेरणी पूर्ण होत आली असून, पेरणी करताना बियाण्याची व जमिनीची निवड योग्य नसेल व बीजप्रक्रियेकडे काटेकोर लक्ष दिले नसेल, तर हे पिक पांढरी बुरशी, मूळकूज, खोडकुज आदी बुरशीजन्य रोगांना बळी पडण्याची शक्यता असते.
 
भुईमूग हे खरीप व उन्हाळी हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे तेल बिया पिक आहे. राज्यात खरीप हंगामात जवळपास दोन लाख हेक्टर तर उन्हाळी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रावर भुईमूगाचे पिक घेतले जाते. गहू काढल्यानंतर अथवा ऊस गेल्यानंतर उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीकडे शेतकरी वळतो. इतर पिक घेण्याच्या दरम्यानच्या १०० ते १२५ दिवसांत अधिकचे पैसे मिळवून देणार्‍या भुईमूगाची लागवड करताना सुयोग्य व्यवस्थापन केले तर उत्तम आर्थिक फायदा होतो. त्यासाठी बियाणांची व जमिनीची निवड, बीजप्रक्रिया या महत्वाच्या बाबी आहेत.
 
भुईमूगासाठी मध्यम भुसभुशीत निचरा होणारी, अधिकचा ओलावा न धरणारी, भरपूर सेंद्रीय पदार्थ असणारी जमीन लागते. हलक्या व निकृष्ट जमिनीवर पिक घेतले. जादा ओलावा धरणारी जमीन असली तर बुरशीजन्य रोगांना निमंत्रण मिळते. पांढरी बुरशी, मूळकूज, खोडकुज या रोगांनी भुईमूग पोखरला जातो. फायद्याचे गणित तोट्यात बदलते.
 
बियाणांची निवड करताना कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या बियाणांची निवड करणे योग्य ठरते. कुठल्या ही पिकाच्या नव्या वाणाचा शोध करण्याआधी कृषी विद्यापीठे त्या त्या पिकांवर येणार्‍या रोग व कीड डोळ्यासमोर ठेवून, त्याला प्रतिकार करणारा वाण व जात शोधून काढतात. दहा बारा वर्षांच्या अथक संशोधनानंतर तयार केलेल्या वाणाची लागवडीसाठी शिफारस केली जाते. त्यामुळे शेतकर्‍यांनी तोच वाण लागवडीखाली आणणे फायद्याचे ठरते. मात्र सध्याच्या जाहिरातीच्या जमान्यात खाजगी कंपन्यानी केलेल्या जाहिरातींना बळी पडून शेतकरी कोणती ही शाश्वती नसणारे त्या कंपन्यांच्या भुईमुगाच्या वाणाची लागवड करतात.नंतर तेच वाण कीडी व रोगांना बळी पडते. त्या वाणांची चाचणी घेतलेली आहे का हा एक संशोधनाचा विषय आहे.
 
पेरणीआधी बीजप्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. पेरणीपूर्वी बियाणास थायरम किंवा कार्बेन्डाझिम अथवा मॅन्कोझेब या बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी. प्रतिकिलो बियाणास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक चोळावे. त्यामुळे बियांमार्फत पसरणार्‍या रोगांना आळा बसतो.बुरशीपासून होणार्‍या खोडकूज, मुळकुज तांबेरा, टिक्का, रोझेटी या रोगांचे नियंत्रण होते.
 
कृषी विद्यापीठांनी दहा ते बारा वर्षे संशोधन करुन कोणत्या ही किडी वा रोगांना बळी न पडणार्‍या भुईमुगाच्या नव्या जाती शोधून काढल्या आहे. त्यांनी एसबी-११, फुले प्रगती, टी.एन जी २४, फुले व्यास, फुले उनप, टी.जी.२६, जेएल ५०१ इत्यादी जातींची लागवडीसाठी त्यांची शिफारस केली आहे. या जातींचा लागवडीसाठी प्राधान्याने विचार केला जावा. कोणत्या ही कीड व रोगांना बळी पडण्याचे त्यांचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे लागवड करताना शेतकर्‍यांनी या जातींचा प्राधान्याने विचार केला जावा. खाजगी कंपन्यांनी तयार केलेल्या जातींची काटेकोर चौकशी करावी. खात्री असेल तरच त्यांचे बियाणे लागवडीखाली आणावे. 

- राजेंद्र वाघमोडे, कृषीतज्ज्ञ 

 

Related Articles